(दापोली)
दापोली शहरातील एसटी स्टॅंडच्या मागील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत बुधवार १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आलेल्या चोरीप्रकरणाचा दापोली पोलिसांनी केवळ २४ तासांत छडा लावत चोरट्याला गजाआड करण्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सोमवारी शाळा उघडल्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील कपाटे उचकटलेली, साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्यानंतर चोरीची घटना स्पष्ट झाली. तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या दापोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या नेतृत्वात पथकाने तांत्रिक तपास, गुन्हेगारी पद्धतीचे सूक्ष्म विश्लेषण आणि स्थानिक माहितीचा वापर करत संशयिताचा माग काढला. अखेर अवघ्या एका दिवसात आरोपीला अटक करून चोरीचा गुन्हा उकलण्यात आला.
या जलद व प्रभावी कामगिरीबद्दल दापोली पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी कारखेले, सहकारी शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, पोलीस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आणि स्थानकातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. दापोली पोलिसांनी दाखविलेली ही फास्टट्रॅक कामगिरी स्थानिकांच्या दृष्टीने प्रशंसनीय ठरली असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

