( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शहरातील झोपडपट्टीधारकांना मतांसाठी सत्ताधाऱ्यांकडून थेट धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. इतकेच नव्हे, तर एका उमेदवाराला निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ‘झोपडपट्टी हटविण्याची’ धमकी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंत म्हणाले, क्रांतीनगर येथील झोपड्या आम्हीच दिल्या, असा दावा सत्ताधारी मंडळी सभांमध्ये करून फुकटचे श्रेय घेत आहेत. प्रत्यक्षात ही कामगिरी आमच्या कार्यकाळात झालेली आहे. पुढे ते म्हणाले की, उमेश शेट्ये नगराध्यक्ष असताना दांडेआडोम येथे कचरा प्रकल्पासाठी जमीन निश्चित करण्यात आली. ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाही न्यायालयाने नगरपरिषदेच्या बाजूने निकाल दिला. तथापि, पाच वर्षे ‘होणार आहे, करणार आहे’ असं सांगणाऱ्यांनी प्रत्यक्षात काय काम केलं, याचेही उत्तर नागरिकांना मिळाले पाहिजे, अशी टोला त्यांनी लगावला.
२०१४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना जाहीर झाल्यानंतर शहरातील झोपडपट्टी निर्मूलनासाठी विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले. ७५३ झोपड्यांची नोंद झाली होती. साळवी स्टॉपजवळील फिल्टर हाऊसच्या मागील जागेबाबत सावंत कुटुंबीयांशी चर्चा करून तीन मजली इमारत उभारून प्रत्येक झोपडपट्टीधारकास ३०० चौरस फूटांचे घर देण्याचा आराखडा तयार झाला होता. परंतु या योजनेचा आजवर दगडही लागलेला नाही, असा आरोप सावंत यांनी केला.
शहर विकासाबाबत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आश्वासनांचीही सावंत यांनी याद केली. भुयारी गटारव्यवस्था, पार्किंगसाठी बहुमजली इमारत, थिबा पॉइंट ते भाट्ये बीचदरम्यान रोपवे, अंतर्गत रस्त्यांचे उन्नतीकरण… अशी कित्येक आश्वासने निवडणुकीच्या तोंडावर दिली गेली. परंतु प्रत्यक्षात किती कामे पूर्ण झाली, हे सत्ताधाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्येच सावंत यांनी केलेले हे आरोप राजकीय हलकल्लोळ निर्माण करणारे ठरले आहेत.

