(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्राचा पाचवा वर्धापन दिन आणि नूतनीकृत योगभवनाचे लोकार्पण सोहळा रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता अरिहंत मॉल (तिसरा मजला), रत्नागिरी येथील उपकेंद्रात उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्वांसाठी निःशुल्क नियमित योगवर्ग सुरू करण्याच्या उद्देशाने नूतनीकृत योगभवनाचे उद्घाटन होणार असून, त्यामुळे रत्नागिरीकरांना नियमित योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. रोशन अलोने, साहित्य विभागाच्या अधिष्ठाता प्रो. कविता होले, वेद व व्याकरण विभागाचे अधिष्ठाता प्रो. हरेकृष्ण अगस्ती आणि परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी उपकेंद्राने संस्कृत शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरेचे संवर्धन, योग शिक्षण व प्रसार, संशोधन, प्रकाशन, प्रशिक्षण तसेच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या संस्कृतप्रेमी, योगशिक्षक, योगसाधक, विविध संस्था, पदाधिकारी आणि नागरिकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी उपकेंद्राच्या पंचवार्षिक कार्याचा आढावा सादर केला जाणार असून ‘कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान’, ‘Interdisciplinary Research in Dharmaśāstra’ आणि ‘सनातन धर्म’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी उपकेंद्र आणि श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात उपकेंद्राला सातत्याने सहकार्य करणाऱ्या डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. आशिष बर्वे, डॉ. दिनेश रसाळ, डॉ. माधवी जोशी, डॉ. शशांक पाटील, डॉ. विवेक भिडे, ॲड. रुची महाजनी, प्रमोद कोनकर, श्रीकांत रांगणेकर, अनंत आगाशे, प्रभात भालेकर आणि संजय घोसाळे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी, संस्कृत भारती (दक्षिण रत्नागिरी), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी, प्राईड इन्स्टिट्यूट (जयसिंगपूर), श्री आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळा (नाणीजधाम), रिगल कॉलेज (गुहागर), रविकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र (सांगली), स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी तपोभूमी (कुंडई, गोवा), कै. गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा, वेदपाठशाळा रत्नागिरी, गणपतीपुळे देवस्थान, पावस संस्थान, स्वाध्याय परिवार, संस्कृत शिक्षक संघ, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, अमित अकादमी, रामानुजन क्लासेस आणि सुसंस्कृतम् – संस्कृत भाषा अध्ययन व अध्यापन केंद्र, कोल्हापूर या संस्थांचाही गौरव करण्यात येणार आहे.
रत्नागिरीतील संस्कृतप्रेमी, योगशिक्षक, योगसाधक, विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि उपकेंद्राच्या यशस्वी पंचवार्षिक वाटचालीचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

