( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूलजवळचा ठेकेदार कंपनीने निर्माण केलेला तीव्र उतार हा अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असून बुधवारी झरेवाडी (रत्नागिरी) येथील शिवम रविंद्र गोताड (वय २०) या तरुणाचा या उतारावर बळी गेला. कोळशाने भरलेला ट्रक ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. या अपघाती घटनेने झरेवाडीसह हातखंबा गावावर शोककळा पसरली आहे.
सकाळी घराबाहेर पडताना “आई, मी लवकर घरी येईन…” असे सांगून घराबाहेर पडलेला शिवम पुन्हा कधीच परतला नाही. एकुलत्या एक मुलाचे असे अकाली जाणे गोताड कुटुंबाला असह्य ठरले आहे. शिवम हा गावातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणारा उत्साही तरुण होता. त्याच्या अकाली निधनाने झरेवाडी गाव हळहळले आहे. बुधवारी सायंकाळी शिवम व त्याचा मित्र निशांत कळंबटे हे दोघे रत्नागिरी आयटीआय येथून दुचाकीवरून घरी जात असताना हातखंबा उतारावर आले असता कोळशाने भरलेल्या ट्रकने मागून दुचाकीला जोराची धडक दिली. या ट्रकने तब्बल आठ वाहनांना धडक देत शिवमलाही चिरडले. अपघातात शिवम जागीच ठार झाला तर निशांत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवमच्या मृत्यूने गोताड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू आणि घरातील आधारवड हरपल्याने कुटुंबिय हतबल झाले आहेत. कोणत्याही आर्थिक मदतीने हे नुकसान भरून निघणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हातखंबा उतारावरील या सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा ठेकेदार कंपनीने निर्माण केलेला तीव्र उतार ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. योग्य रस्ते उभारणी आणि वाहतूक व्यवस्थापन न झाल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
ओव्हरलोड वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर; चिरीमिरीचा धंदा सुरू?
हातखंबा उतारावर अपघातांचे सत्र सुरू असताना त्यामागे ओव्हरलोड वाहनांची बेधडक वाहतूक हा एक मोठा घटक ठरत आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक थेट हातखंबा टॅबच्या पोलिसांच्या नजरेसमोरून होते. तरीदेखील कुठलीही कारवाई होत नाही. उलट अशा वाहनांवर कारवाई करण्याऐवजी चिरीमिरी घेऊन डोळेझाक केली जाते, अशी जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. ओव्हरलोड ट्रक उतारावरून बेफाम वेगाने जातात आणि त्याचाच परिणाम म्हणून निरपराध नागरिकांचा जीव जात आहे. तरीसुद्धा पोलिसांकडून कुठलीही कठोर पावले उचलली जात नाहीत. हे चित्र नागरिकांच्या रोषाला अधिक खतपाणी घालत आहे.
ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल
हातखंबा तिठा ते हातखंबा गाव या दरम्यान महामार्गाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने ट्रक (क्र. केए-29-सी-1843) चालवला. त्यामुळे हातखंबा उतारात ट्रकवरील ताबा सुटला आणि पुढील तसेच समोरून येणाऱ्या वाहनांना धडक देत भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार शिवम गोताडचा मृत्यू झाला, तर निशांत सुरेश कळंबटे (21, रा. झरेवाडी), कृष्णादेव भारत येडगे (36, रा. झरेवाडी), सत्यविनायक सुरेश देसाई (48, रा. हातखंबा), सुदेशकुमार शिवाजीराव चव्हाण (45, रा. लांजा) आणि समिर प्रकाश दळवी (40, रा. लांजा) हे पाच जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालक विजय शिवयोगी मडीवाल (23, रा. बेळगाव, कर्नाटक) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

