(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भूतेवाडी येथे असलेल्या जागृत देवस्थान श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी देवीचे मुखवटे लावून सकाळी ११ वाजता घटस्थापना करण्यात आली. संध्याकाळी ७.३० वाजता देवीची महाआरती तर रात्री १० वाजता ग्रामस्थांनी भजनसंध्या सादर केली.
उत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत १ ऑक्टोबर २०२५ रोजी बलिदान दिन साजरा करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता देवीची महाआरती, प्रसाद वाटप व रात्री ८ वाजता भगवती देवीचा गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. तसेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसऱ्याच्या दिवशी तोरण बांधून सायंकाळी ४ वाजता देवीची पूजा व आरती होईल. यानंतर ‘सोने लुटणे’ या पारंपरिक सोहळ्यानंतर उत्सवाची सांगता होईल.
मेर्वी ग्रामस्थ मंडळाने सर्व भाविकांना या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. नवसाला पावणाऱ्या या जागृत देवस्थानात सध्या भाविकांची गर्दी उसळली असून परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला आहे.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

