(ठाणे)
डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ घरगुती वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ज्योती धाहीजे (वय अंदाजे ३०) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती पोपट धाहीजे हा हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुळचे जालना जिल्ह्यातील असलेले पोपट आणि ज्योती धाहीजे हे दाम्पत्य गेल्या तीन ते चार वर्षांपासून डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथील भाड्याच्या खोलीत राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. बुधवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी दोघांमध्ये पुन्हा किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात पोपटने पत्नी ज्योती हिचा गळा आवळून खून केला. हत्या केल्यानंतर आरोपी पती घराला कुलूप लावून फरार झाला.
घटनेची माहिती शेजाऱ्यांनी मानपाडा पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात ज्योतीचा मृतदेह पाहून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी असे तीन लहान अपत्ये आहेत. घटनेमुळे परिसरात भीती आणि दु:खाचे वातावरण पसरले आहे.
आरोपी पोपट धाहीजे डोंबिवलीतील एका मोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवर बिगारी मजूर म्हणून काम करत होता. पोलिसांनी त्याच्या संभाव्य संपर्क ठिकाणांची तपासणी सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, नातेवाईकांच्या संपर्कातून माहिती गोळा केली जात आहे. नेमका वाद कशावरून झाला, त्यामागे आणखी काही कारण होते का, हे आरोपीला अटक झाल्यानंतरच आता स्पष्ट होणार आहे.

