(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील पाली येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान, पाली-पाथरट यांचा वार्षिक शिमगोत्सव शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ पासून मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात प्रारंभ होत आहे. पारंपरिक विधी, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक सोहळ्यांनी नटलेला हा उत्सव परिसरातील भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. देवाची पालखी सजविणे, देवाला रूपे लावणे, होळी आणणे, पौर्णिमेचा होम, नवस बोलणे-फेडणे यांसारखे विविध धार्मिक विधी उत्सवकाळात पार पडणार असून सुप्रसिद्ध नमनाचे कार्यक्रमही रंगणार आहेत.
उत्सवाच्या नियोजनासाठी नुकतीच फाक पंचमीदिवशी मंदिरात सभा पार पडली. देवस्थानचे अध्यक्ष व मुख्य मानकरी संतोष सावंतदेसाई (खोत) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. उद्या दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत पालखी सजविणे व देवाला रूपे लावणे हा कार्यक्रम होईल. सायंकाळी पूजा व घाट धुपारती आरतीनंतर सायं. ७ ते रात्री ११.३० पर्यंत पालखी दर्शनासाठी खुली राहील. त्यानंतर मंदिर प्रांगणात पालखी खेळविण्याचा पारंपरिक सोहळा होईल. दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी सहाणेवरून गावकरी होळी आणण्यासाठी जातील. रात्री होळीजवळ नवस बोलणे-फेडणे कार्यक्रम होईल आणि त्यानंतर पाली गावच्या सुप्रसिद्ध नमनाचा कार्यक्रम सादर केला जाईल.
दि. २ मार्च रोजी कोकड होळी आणण्याचा विधी पार पडेल. सायंकाळी कोकड होळी आगमनानंतर रात्री गुलालाची उधळण करीत होळी मोडण्याचा सोहळा रंगेल. त्यानंतर पौर्णिमेचा होम व नवस फेडणे कार्यक्रम होईल. पाथरट गावच्या नमनाने त्या दिवसाची सांगता होईल. दि. ३ मार्च रोजी धुळवडी निमित्त ढोल-निशाणाची मिरवणूक काढण्यात येईल. दि. ८ मार्च रोजी रंगपंचमीदिवशी सहाणेवरील बैठक, शिपणयांचा कार्यक्रम आणि देवाच्या ग्रामफेरीचे नियोजन करण्यात येईल. देवतळे येथील ‘देवाचा आंबा’ येथे पालखी जाऊन गावपूजा स्वीकारेल. त्यानंतर गादीवर मुख्य मानकरी यांच्या घरी पूजा होऊन मानाप्रमाणे घरोघरी पालखी फेरी काढली जाईल.
दि. १९ मार्च रोजी गुढीपाडव्यादिवशी ग्रामफेरीची सांगता होईल. गादीवर पूजा, सवाशेराचा महानेवैद्य व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. रात्री गावकऱ्यांचे नमन होईल. त्यानंतर दि. २० मार्च रोजी गावबैठकीनंतर ढोलताशांच्या गजरात पालखी मंदिरात प्रवेश करेल. गावाचे गाऱ्हाणे मांडल्यानंतर घाट धुपारतीने पूजा होऊन श्रीदेव व पालखीत स्थानापन्न सर्व देवतांची मंदिरात पुनःस्थापना केली जाईल. शिमगोत्सवाच्या निमित्ताने पालखीत विराजमान असलेल्या विविध देवतांच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष व मुख्य मानकरी संतोष सावंतदेसाई यांनी केले आहे.

