(पुणे)
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये. 15 मार्च 2024 रोजी चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी. शिक्षणासेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी. शाळा स्तरावरील शिक्षकांना दिले जाणारे ऑनलाइन व अशैक्षणिक कामे बंद करावी. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करावी. नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावी. अल्पसंख्यांक शाळांना संच मान्यता व नियुक्ती मान्यता याबाबत विशेष सवलत द्यावी. शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
तरी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा बंद करून जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, सचिव शिवाजी कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी केले आहे.

