( नवी दिल्ली )
इंडियन वर्ल्ड कल्चरल फोरम प्रस्तुत इंडियन डान्स ग्रँड प्रिक्स 2025 या देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत चिपळूणची सुकन्या स्वामिनी नंदन सुर्वे हिने देशात दुसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे.
ही भव्य राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्लीतील विशाल इंडियन इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये पार पडली. कथ्थक या नृत्यप्रकारातील सोलो सादरीकरणात स्वामिनीने आपल्या अप्रतिम अंगप्रयोग, लयकारी, पदन्यास आणि भावप्रदर्शनाने रसिकांसह परीक्षकांनाही मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेसाठी देशभरातून निवडलेल्या ८० उत्कृष्ट नर्तकांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम परीक्षक मंडळी कथक केंद्राच्या भूतपूर्व संचालिका प्रन्नमी भगवती, कथ्थक गुरू सुभाष चंद्रा आणि नृत्यांगना व दूरचित्रवाणी कलाकार कल्पना भूषण यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
स्वामिनी सुर्वे ही चिपळूण येथील नृत्य मल्हार अकॅडमीची विद्यार्थीनी असून, नृत्यालंकार गुरु स्कंधा चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ती गेली पाच वर्षे कथ्थकचे शिक्षण घेत आहे. स्पर्धेत तिने चतरंग, ठुमरी, तराना आणि ताल या नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. भाव, लय व ताल यांचा नेमका आणि समतोल मिलाफ साधत तिने परीक्षकांची मने जिंकली.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत स्वामिनीने सोलो विभागात द्वितीय क्रमांक पटकावला असून तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

