(गणपतीपुळे / वैभव पवार)
देवदिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालगुंड येथे उबाठा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या मालगुंड शाखेतर्फे पारंपरिक विटीदांडू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी मातीतील ओळख हरवत चाललेल्या या खेळाला नवसंजीवनी मिळवून देण्याचा प्रयत्न या स्पर्धेमार्फत करण्यात आला.
मालगुंड परिसरातील तब्बल १२ संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत कर्णधार रविंद्र रघुनाथ गोरीवले यांच्या नेतृत्वाखालील रहाटागरवाडी मालगुंड संघ प्रथम विजेता, नविन्द्रवाडी मालगुंड संघ द्वितीय विजेता, तर जोशीवाडी मालगुंड संघ तृतीय विजेता ठरला.जुन्या खेळाचा आनंद लुटता यावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने क्रिडा प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला.
या स्पर्धेच्या शेवटच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात रहाटागरवाडी मालगुंड संघाने 11 लालाचे उद्धीष्ट ठेवले होते. यावेळी नविन्द्रवाडी मालगुंड संघाला 9 लालापर्यंत मजल मारता आली. अखेर मालगुंड रहाटागर संघाने आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले. या संघाला अंतिम सामन्यात विजयी करण्यासाठी या संघाचे खेळाडू मकरंद पात्ये आणि कर्णधार रविंद्र गोरिवले हे “गेमचेंजर” ठरले. त्यांनी आपल्या संघासाठी अत्यंत मोलाचे योगदान देऊन अंतिम सामना आपल्या बाजूने फिरवण्यात यश प्राप्त केले.
या स्पर्धेतील अंतिम तीन संघांना रोख पारितोषिक आणि विजेतेपदाची ट्रॉफी प्रमुख मान्यवरांच्या यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तर अन्य ट्रॉफींचे वितरण ही यावेळी करण्यात आले.
कोकणी मातीतील परंपरा जपण्याचा आणि ग्रामीण खेळांना नवा ऊर्जाविष्कार देण्याचा उपक्रम म्हणून या स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा पारंपरिक खेळाला प्रत्येक कोकणी माणसाने नवी उभारी देऊन नव्या पिढीला या दुर्लक्षित खेळाकडे वळवून अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन करावे, असे जनमत आता व्यक्त होत आहे.

