(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या भाटये परिसरात गांजासारख्या अमली पदार्थाची साठवणूक करणाऱ्या पाच तरुणांवर शहर पोलिसांनी बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी १७ ग्रॅम गांजा आणि एक फॉर्च्युनर कार असा मिळून एकूण सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भाटये परिसरातील कोहिनूर हॉटेलकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर गस्त घालण्यात आली होती. यावेळी फॉर्च्युनर कारमधून काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तात्काळ छापा टाकून पाच तरुणांना अटक करण्यात आली. अमान नौशाद शेखासन (२६, रा. राहत अपार्टमेंट), राज नितीन राऊत (२५, रा. शिवाजीनगर), कैफ होडेकर (२१, रा. भाटये), दानिश मेहबुब मुल्ला (रा. आरोग्यमंदिर) आणि मुसद्दीक म्हसकर (२२, रा. कर्ला) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या पाचही संशयितांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली. तिघा संशयितांच्यावतीने ॲड. सुहेल शेख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असून, शहर परिसरातील तस्करीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भाटये येथे होणाऱ्या तस्करीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेली ही कारवाई यशस्वी ठरली असून, अशा प्रकारच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.