( रत्नागिरी / प्रतिनिधी )
स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि अमली पदार्थविरोधी जनजागृतीचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी पोलिस दलाने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली, अमली पदार्थ मुक्त दौड आणि किनार स्वच्छता मोहीम अशा उपक्रमांचे आयोजन केले. ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ आणि ‘Say No to Drugs’ या घोषणांनी तिन्ही उपक्रम उत्साहात पार पडले.
विशेष पोलिस महानिरीक्षक (कोंकण परिक्षेत्र) संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत पोलिस मुख्यालयापासून मारुती मंदिरापर्यंत आणि पुन्हा परत असा तिरंगा रॅलीचा जल्लोष रंगला. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, राखीव पोलिस निरीक्षक कुळसंगे यांच्यासह ७० हून अधिक पोलिस अंमलदारांनी रॅलीत सहभाग घेतला. ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’चा नारा देत देशभक्तीची लहर उंचावली.
त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ५ किमी अंतराची ‘अमली पदार्थ मुक्त रत्नागिरी दौड’ आयोजित करण्यात आली. पोलिस मुख्यालय – जयस्तंभ भाट्ये समुद्रकिनारा झरी विनायक मंदिर – जयस्तंभ – पोलिस मुख्यालय असा मार्ग ठरवण्यात आला. पोलिस अधिकारी, २०० हून अधिक अंमलदार, ‘लायन्स क्लब’ व ‘रत्नागिरी सायकलिस्ट असोसिएशन’चे सदस्य, तसेच कवायत निर्देशकांच्या उपस्थितीत ही दौड पार पडली.
दौडीनंतर भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विशेषतः प्लास्टिक कचरा गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे किनारपट्टी पर्यटनाला चालना मिळेल, असा संदेश या उपक्रमातून देत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पालक, नागरिक व विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. ‘फिट इंडिया मूव्हमेंट’मध्ये सहभागी होऊन निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. भाट्ये समुद्रकिनारी फुटबॉल खेळून त्यांनी क्रीडाप्रेमी तरुणांना प्रेरित केले.