( रत्नागिरी /प्रतिनिधी )
आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला. या पार्श्वभूमीवर दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पासुन संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहीता लागु करण्यात आलेली आहे. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चालणारे अवैध धंद्यांवर, कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांची तपासणी दरम्यान खानु येथे गोवा बनावटीची 88 लाखांची दारू जप्त करून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीचा काळ सुरू असल्याने पोलीसंची महामार्गावर करडी नजर आहे. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रीपासुन महामार्गावर पेट्रोलींग करुन वाहनाची तपासणी करीत होते. याचवेळी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी गोवा ते मुंबई जाणारे हायवेवर वाहनांची तपासणी करीत असताना खानु गावातील ब्राम्हणवाडी येथे २ चारचाकी गाड्या उभ्या असल्याचे दिसुन आले. या गाडयांचा संशय आल्याने पोलिसांनी गाडी जवळ जावून चालकांची चौकशी करुन दोन्ही गाडयांची तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये गोवा बनावटी दारुचे बॉक्स भरलेले सापडले. एका गाडीचा चालक अक्षय चंद्रशेखर घाडीगांवकर (वय २९, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) दुसऱ्या गाडीचा चालक विजय प्रभाकर तेली ( वय ३२, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) या दोन्ही गाड्यांमधील रु. ८७,९३,७६० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी रत्नागिरी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुअशा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोऊनि गावडे, सपोफौ पांडुरंग गोरे, पोहवा सुभाष भागणे, नितीन डोमणे, बाळू पालकर, शांताराम झोरे, विक्रम पाटील अमित कदम, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, प्रविण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे, दत्तात्रय कांबळे स्थागुअशा रत्नागिरी, यांनी केली आहे. तसेच रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी देखील कारवाई करण्यास मदत केली आहे.