(रत्नागिरी / प्रतिनिधी)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदी भूमिकांमुळे रसिकांच्या ओठांवर कायम स्मित आणणारा अभिनेता श्रमेश बेटकर आता मोठ्या पडद्यावरही आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता श्रमेश बेटकर आणि अभिनेत्री जुईली टेमकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. दिग्दर्शक विनीत परुळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा सिनेमा निखिल बने, प्रभाकर मोरे, धनश्री काडगांवकर, मंदार मांडवकर आणि शशिकांत केरकर यांसारख्या गुणी कलाकारांनी गाजवला आहे. अलीकडेच सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगलेल्या प्रीमियरमध्ये श्रमेशच्या कुटुंबीयांची विशेष उपस्थिती लक्षणीय ठरली.
हास्यजत्रेत विविध स्किट्समधून आपली बहुमुखी प्रतिभा सिद्ध करणारा श्रमेश, आता पहिल्याच चित्रपटाद्वारे अभिनयासह लेखन क्षेत्रातही पदार्पण करत आहे. कथानक, पटकथा आणि संवाद या तीनही जबाबदाऱ्या त्याने समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट श्रमेशसाठी जितका महत्त्वाचा, तितकाच त्याच्या कुटुंबासाठीही अभिमानाचा ठरला आहे.
याच अभिमानाची झलक त्याची पत्नी सविता मेस्त्री यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या हृदयस्पर्शी पोस्टमधून उमटली. “सर्वार्थाने माझा ‘लास्ट स्टॉप खांदा’ म्हणजे श्रमेशच. तूच माझा मित्र, माझं प्रेम आणि माझा संपूर्ण आधार…,” अशा मनोभावे केलेल्या सुरुवातीने त्यांनी आपल्या भावनांना उधाण दिले. “ही पोस्ट वाचताना तू हसल्याशिवाय राहणार नाहीस, पण यात अतिशयोक्तीचा कणभरही अंश नाही,” असेही त्या म्हणाल्या.
चित्रपटाची निर्मिती, लेखन, नरेशन, प्रोडक्शनपासून पोस्ट-प्रोडक्शनपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील श्रमेशची धडपड त्यांनी जवळून पाहिली. “‘श्री’ पासून ते ‘समाप्त’पर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाची मी साक्षी आहे. तुझ्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम,” अशा शब्दांत सवितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
श्रमेशचे अभिनेता होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहून ती पुढे म्हणतात, “मोठ्या पडद्यावरील लीड हिरोंच्या यादीत तुझे नाव पहिल्यांदा झळकताना पाहून मन अभिमानाने भारावून गेले आहे. रसिक प्रेक्षकांना तुझ्यातील प्रामाणिक कलाकार खूप आवडतो; आता या चित्रपटातून ते पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतील, याची मला खात्री आहे.”
पोस्टच्या अखेरीस सवितांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा देत लिहिले “‘लास्ट स्टॉप खांदा’च्या सर्व मेहनती टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या कष्टांना प्रेक्षकांचे आशीर्वाद नक्की लाभतील. आय लव्ह यू श्रमेश, आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे.”

