(मुंबई / निलेश कोकमकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्दचे सुपुत्र, जाखडी–नमन या कोकणातील प्रख्यात लोककला परंपरेचे जतनकर्ता शाहीर जयंत राजाराम चव्हाण (उर्फ बापू) यांना यंदाचा ‘कलगी तुरा शाहीर पुरस्कार – 2025’ जाहीर झाला आहे. कलगी तुरा लोककला संवर्धनात अविरत कार्यरत असणाऱ्या कलगी तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जाणार असल्याचे निवड पत्र सरचिटणीस श्री. संतोष धारशे यांनी सुपूर्द केले.
लहानपणापासूनच संगीत व गायनाची ओढ असलेल्या बापू चव्हाण यांनी वयाच्या १७व्या वर्षी गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी (रा. खेड) यांच्या मार्गदर्शनाखाली लोककलाक्षेत्रात पहिले पाऊल टाकले. गेली तब्बल ४० वर्षे त्यांनी जाखडी, नमन आणि शाहिरी परंपरेचे संवर्धन करत सातत्याने कार्य केले आहे. तसेच कलगीतुरा समन्वय समिती, संगमेश्वर–देवरुख येथे ते 25 वर्षे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी निभावत आहेत. सामाजिक आणि कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सतत सन्मान होत राहिला आहे.
दरम्यान, माजी आमदार सुभाष बने यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी मंजुरी देत बापू चव्हाण यांची राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समिती (जिल्हा रत्नागिरी) सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे संगमेश्वर तालुक्यातील विविध कलावंतांना नवी दिशा मिळणार आहे.
यंदाचा ‘कलगी तुरा शाहीर पुरस्कार’ तसेच त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे संगमेश्वर तालुक्यातील कलावंत, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत मीरा रोड (पूर्व), दहिसर चेकनाका जवळील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात भव्यदिव्य सोहळ्यात करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात प्रथमच मुंबई नगरीत गौरी–गणेश नृत्य स्पर्धा 2025, तसेच दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन आणि शाहीर गुणगौरव सोहळा देखील होणार आहे.

