(संगमेश्वर)
मानवी नात्याला काळीमा फासणारी थरारक घटना देवरुख येथे उघडकीस आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी ८० वर्षीय वडिलांचेच अपहरण करणाऱ्या नराधम मुलाला पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा उलगडा झाला. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. देवरुख, ता. संगमेश्वर) असे अटकेत घेतलेल्या मुलाचे नाव आहे. त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांचे अपहरण करून त्यांचा हात-पाय बांधलेला फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
या घटनेची तक्रार अपहरण झालेल्या वृद्धाची पत्नी सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी देवरूख पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्पर तपास करून आरोपी मुलाला चिपळूण परिसरातून बेड्या ठोकल्या.
आई आणि नातीसमोरच थरार
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना नियमित पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा श्रीकांत याने सोमवारी रात्रीपासून घरात मोठा गोंधळ घातला. आई आणि नातीसमोरच त्याने सुरा दाखवत, “एक लाख रुपये द्या नाहीतर वडिलांना ठार मारीन,” अशी धमकी दिली. त्यानंतर वडिलांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि सह्याद्रीनगरच्या दिशेने घेऊन गेला.
खंडणीचा फोटो आणि धमक्या
पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नात वेदांगीच्या मोबाईलवर अपहरण झालेल्या वडिलांच्या फोनवर व्हॉट्सअॅप कॉल आला. त्या कॉलवर वृद्ध वडिलांचा हात-पाय व तोंड प्लॅस्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला. त्यासोबतच श्रीकांतने एक लाख रुपयांची मागणी करत, “पैसे नाही दिलेत तर आता मागे हटणार नाही,” अशी धमकी दिली.
आईचे धाडस, पोलिसांची तत्पर कारवाई:
या प्रसंगानंतर आई सुनिता मराठे यांनी धैर्य दाखवत थेट देवरूख पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीचा शोध घेतला आणि चिपळूण परिसरातून त्याला अटक केली. सध्या देवरूख पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

