(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे दिवाळी पर्यटन आता थंडीच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळाला विविध ठिकाणच्या पर्यटकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तसेच या हंगामात शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सहलींची अधिक पसंती गणपतीपुळ्याला मिळते, अशी माहिती स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
थंडीचा पर्यटन हंगाम म्हटला की, कोकणातील निसर्गरम्य वातावरण सर्वच पर्यटकांना खुलावणारे असते. या हंगामात पहाटेच्या सुमारास पडणारा थंडीचा सुखद गारठा आणि डोंगरदर्यातून व रस्त्यांवरून दिसणारे दाट धुके असे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना पाहण्यासारखे असते. त्यामुळे कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यातील निसर्गरम्य गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे पर्यटन असल्याने या ठिकाणी पावसाळी आणि उन्हाळी पर्यटनाबरोबरच हिवाळी पर्यटनाला देखील तितकाच प्रतिसाद पर्यटकांकडून मिळतो. या हंगामात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींचा ओघ सुरू झाला आहे . दरवर्षी या ठिकाणी सहलींची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती देखील प्राप्त होते. त्यामुळे यंदादेखील तितकाच प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकूणच थंडीच्या पर्यटन हंगामामध्ये येथील पर्यटनाला वाढती चालना मिळू लागली आहे.त्यामध्ये हॉटेल लॉजिंग व्यवसायिकांबरोबरच सर्वच लहान मोठ्या व्यवसायिकांच्या व्यवसायाला आर्थिक उलाढालीची व पर्यटनाची चालना मिळू लागली आहे. एकूणच या हंगामात पर्यटकांचा राबता सुरू झाला असून येथील येथील स्वयंभू श्रींच्या दर्शना बरोबरच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक थंडीच्या हंगामामध्ये गणपतीपुळे पर्यटन स्थळाकडे पुन्हा आकर्षित होऊ लागले आहेत.
नाताळ व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची होते सर्वाधिक गर्दी!
दरम्यान, थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या एंडिंग मध्ये नाताळ व सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने अनेक पर्यटक दाखल होत असतात .या निमित्ताने येथील विविध पर्यटनात्मक बाबींचा घेण्यासाठी घेण्यासाठी आणि विशेषत: सरत्या वर्षातील वर्षातील मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटन मोठ्या संख्येने गणपतीपुळे ला पसंती दर्शवितात. याच हंगामात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस उत्पादन वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित केले जाते. यानिमित्ताने पर्यटकांना कोकणातील विविध वस्तू व उत्पादनांची खरेदी करण्याचा आनंद मिळतो. तसेच कोकणातील विविध दर्जेदार उत्पादने व वस्तू या प्रदर्शनामध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे डिसेंबर महिना हा पर्यटकांसाठी एक विशेष पर्वणी ठरतो.
थंडीच्या हंगामातील पॅराग्लायडिंग राईड ठरते खास आकर्षण दरम्यान गणपतीपुळे नजीकच्या मालगुंड येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळाच्या समुद्र चौपाटीवर वॉटर स्पोर्ट व अन्य व्यवसायांबरोबरच पॅराग्लायडिंग ही वेगळी पर्यटन सफर पर्यटकांना घडवून आणली जाते. त्यामुळे या राईटचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे मध्ये येणाऱ्या पर्यटकांची पावले मालगुंड कडे वळत असतात. उंच आकाशात घेऊन जाणारी ही सफर अनेक पर्यटकांना एक वेगळा आनंद देऊन जाते. या पर्यटन सफर मध्ये मालगुंड गणपतीपुळे येथील संपूर्ण निसर्गरम्य परिसर आणि स्वयंभू श्रींचे मंदिर पाहण्याचा आनंद थेट उंच आकाशात पॅराग्लायडिंग राईट करून पर्यटकांना घेता येतो. त्यामुळे थंडीच्या हंगामातील पॅराग्लायडिंग राईट विशेष येणाऱ्या सर्वच पर्यटक आणि विशेषत: सहलीतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण ठरते.

