(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात जास्त वाहतूक कोंडी निर्माण करणारा कुवारबाव जंक्शन लवकरच सिग्नलमुक्त होणार आहे. रत्नागिरी शहरातून हातखंब्याकडे जाताना सातत्याने अडथळा ठरत असलेल्या या महत्त्वाच्या चौकात तब्बल ९० कोटी रुपयांच्या भव्य उड्डाणपुलाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून हा मोठा निधी मंजूर झाला आहे.
कुवारबाव परिसरात दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे येथे फक्त रस्ता रुंदीकरण होणार की स्वतंत्र उड्डाणपूल उभारला जाणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागले होते. वाढत्या वाहतूक ताणाचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा करत केंद्राचे लक्ष वेधले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत उड्डाणपुलाची मागणी साकार झाली आहे.
प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून येत्या फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई–गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहनतळवळ वाढली आहे. अशा परिस्थितीत कुवारबाव येथील हा नवा उड्डाणपूल भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणार असला तरी कुवारबावातील स्थानिक व्यापार जगत मात्र संभ्रमात आहे. कुवारबाव ही आकाराने लहान बाजारपेठ असली, तरी तिची ओळख रस्त्यालगत सलग पसरलेल्या किराणा, हार्डवेअर, भाज्या–फळांपासून कपडे, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या विविध दुकानांमुळे आहे. प्रवाशांना वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून लागलेली खरेदी सहज करता येत असल्याने ही बाजारपेठ वर्षानुवर्षे फुलत आली.
मात्र, उड्डाणपुलाच्या प्रस्तावित रचनेनुसार वाहतूक पूर्णपणे एकमार्गी व वेगवान होणार असल्याने वाहने थांबविण्याची शक्यता अत्यल्प राहणार आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या मते, या बदलामुळे त्यांच्या दुकानांकडे येणारी ग्राहकवर्दळ लक्षणीय घटू शकते. रस्त्यावरची ‘चलती ग्राहकसंख्या’ हेच त्यांच्या व्यवसायाचे मुख्य बळ आहे. एकदा पुलावरील वाहतूक थेट पुढे सरकू लागली, की या लहान बाजारपेठेतील चैतन्याला तडा जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

