(मुंबई)
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण मधील राजकोट किल्ल्यावर 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्या प्रकरणी सिंधुदुर्गातील मालवण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक आरोपी म्हणजे स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तर राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी रात्री उशिरा कल्याणमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी ७ पथके रवाना केली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला ताब्यात घेतलं. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी आरोपी जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या घरी आला होता. मात्र अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. घटनेनंतर जयदीप आपटेचे कुटुंबीय कल्याणमधील राहते घर सोडून शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. पण पोलिसांनी तिथे जावून जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयदीपची आई आणि पत्नी कल्याण येथील राहत्या घरी आले होते. पोलिसांनी तिथे देखील त्यांची चौकशी केली होती. जयदीप सापडत नसल्याने पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली होती. अखेर आज रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत आपटे पत्नी व आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. जयदीप सापडल्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.
महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर जयदीप आपटे फरार झाला होता. त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. काल 3 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी आपटेविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. कोणत्याही राष्ट्रीय विमानतळावरून भारताबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी ही नोटीस जारी केली होती.
महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी या प्रकरणाची फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात दुसरा आरोपी जयदीप आपटे गायब होता. त्याचा मोबाईल देखील बंद असल्याने पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा सापडत नव्हता. मालवण पोलिसांनी ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस देखील बजावली होती. मात्र त्यानंतर देखील तो हजर राहिला नव्हता. या प्रकरणातील अन्य एक आरोपी चेतन पाटील हा कोल्हापूर पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चेतन पाटील याला न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.

