(मुंबई)
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांच्या चाहत्यांनी वाट पाहत असलेल्या आनंददायी क्षणाचा खुलासा अखेर झाला आहे. 2023 मध्ये विवाहबद्ध झालेल्या या स्टार कपलने 19 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या पहिल्या अपत्याचं, एका गोंडस मुलाचं स्वागत केलं. जन्माच्या महिनाभरानंतर परिणीती आणि राघव यांनी आपल्या लाडक्या बाळाच्या नावाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.
19 नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी मुलाचे पहिले सुंदर क्षण दाखवणारे फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये दोघेही मुलाच्या पायांना प्रेमाने चुंबन देताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ते त्याचे छोटेसे पाय हातात धरताना दिसतात. या पोस्टसोबत दोघांनी लिहिलं – “जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम्, तत्र आणि नीर. आमच्या मनाला जीवनाच्या अनंत थेंबात शांती मिळाली. आम्ही त्याचं नाव ‘नीर’ ठेवलं – शुद्ध, दिव्य, अमर्याद.”
‘नीर’ या नावाचा सुंदर अर्थ
‘नीर’ म्हणजे पाणी, ज्याला स्वतःचं एक निश्चित स्वरूप नसतं. ते ज्या साच्यात जातं, त्याच आकाराचं होतं. त्याचप्रमाणे प्रेमाचंही कोणतंही एक स्वरूप नसतं; ते परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतं, रूपांतरित होतं आणि निसर्गाशी एकरूप होतं. परिणीती–राघव यांनी त्यांच्या मुलासाठी हे नाव निवडण्यामागे हीच तत्त्वज्ञानाची सुंदर प्रेरणा आहे.
या खास घोषणेनंतर चाहते, मित्रमंडळी आणि अनेक सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गौहर खान, सबा पटौदी खान, भारती सिंग, निमरत कौर यांसह अनेकांनी या नव्या पालकांना शुभेच्छा दिल्या.
परिणीतीचा आगामी वर्कफ्रंट
आई झाल्यानंतरही परिणीती तिच्या प्रोजेक्ट्सवर तितक्याच उत्साहाने काम करताना दिसत आहे. ती लवकरच रेन्सिल डी’सिल्वा दिग्दर्शित नेटफ्लिक्सवरील एका अनटायटल मिस्ट्री-थ्रिलर सीरिजमध्ये झळकणार आहे. तसेच ‘जहूर’ या चित्रपटात आणि ‘शिद्दत 2’ मध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. याआधी ती दिलजीत दोसांझसोबतच्या ‘अमर सिंह चमकिला’ चित्रपटात दिसली होती, जो प्रेक्षकांनी खास पसंत केला होता.

