( रत्नागिरी / वार्ताहर )
तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक आराखडे तयार करण्यात दिरंगाई आणि निष्काळजीपणा झाल्याचे समोर आल्यानंतर ५१ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, मुदत संपलेल्या ९५ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायतींवर यापूर्वी नियुक्त केलेल्या प्रशासकांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नवीन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई निवारण आराखड्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मोजक्याच प्रशासकांनी टंचाई निवारण आराखडे तयार केले असून, बहुतांश प्रशासकांनी ते तयारच केले नसल्याची बाब उघड झाली.
पाणीटंचाईचे संकट गंभीर असताना आवश्यक नियोजनात झालेल्या या दिरंगाईबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. टंचाई निवारणाच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या प्रशासकांना तातडीने बदलून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार जुन्या ५१ प्रशासकांना हटवून नवीन प्रशासकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील संबंधित कलमांनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी ५१ ग्रामपंचायतींसाठी सुधारित नियुक्ती आदेश जारी केले आहेत. त्यानुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी अंकुर सुरेश कांबळे (विस्तार अधिकारी-कृषी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालगुंड, भगवतीनगर आणि नाणीज या ग्रामपंचायतींची जबाबदारी पी. एन. सुर्वे (विस्तार अधिकारी-पंचायत) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नाचणे आणि पावस येथे एन. एम. परहाते (विस्तार अधिकारी-पंचायत), तर पाली येथे एस. एच. गीते (पर्यवेक्षिका) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हातखंबा आणि मिरजोळे ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी प्राजक्ता नागवेकर (विस्तार अधिकारी-पंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चांदेराई ग्रामपंचायतीची जबाबदारी सुधाकर मुरकुटे (विस्तार अधिकारी-शिक्षण) यांच्याकडे देण्यात आली असून, खेडशी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी के. जी. खेडसकर (पर्यवेक्षिका) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त प्रशासकांनी नियमांच्या अधीन राहून ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. विशेषतः टंचाई निवारणाची कामे, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी आणि इतर प्रशासकीय कामांना प्राधान्य देऊन वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या सर्व आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


