(लांजा / रत्नागिरी)
घराच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी पाणी मारण्याकरिता नदीत लावलेल्या पंपात पाणी भरण्यास गेलेले प्रकाश नारायण शिंदे (वय ६५, रा. वेरवली बुद्रुक, रामगाव, ता. लांजा) हे तेलीवाडी–लाडवाडी गणपती विसर्जन घाटाजवळ नदीकाठी पडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
ही घटना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. शिंदे यांना यापूर्वी दोन ते तीन वेळा हृदयविकाराचे झटके येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण ‘मायोकार्डियल इन्फार्क्शन’ (हृदयविकाराचा झटका) असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


