( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तब्बल ३४ वर्षे पोलिसांच्या हाती लागण्यापासून दूर राहिलेल्या मंडणगड पोलीस ठाण्यातील एका जुन्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अखेर कर्नाटकातून ताब्यात घेण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘RAIDS App’च्या साहाय्याने आरोपींच्या छायाचित्रांचे पुनर्निर्माण, तसेच गोपनीय माहिती आणि स्थानिक पातळीवरील तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. १९९२ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा ३४ वर्षांनंतर लागलेला शोध हा जुन्या प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता अधोरेखित करणारा ठरला आहे.
मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५/१९९२ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४२९, २८६ आणि स्फोटक पदार्थ अधिनियमातील कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मधुराज पुटरंग पहाडी राजपूत आणि सुब्रमणी चीनाराजू पहाडी राजपूत हे दोघेही दीर्घकाळापासून फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. अखेर १७ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कर्नाटकातील हुन्सूर परिसरातून या दोघांना ताब्यात घेतले. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘RAIDS App’ विकसित केले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीच्या माध्यमातून पाहिजे व फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांचे १०८ विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्माण करता येते.
या प्रकरणातही या ॲपचा वापर करून आरोपींच्या छायाचित्रांचे पुनर्निर्माण करण्यात आले. त्यानंतर उपलब्ध गोपनीय माहिती आणि स्थानिक पातळीवरील माहितीची सांगड घालत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अखेर कर्नाटकातील हुन्सूर परिसरात त्यांना शोधून ताब्यात घेण्यात आले. पारंपरिक तपासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने दशकांपासून प्रलंबित असलेल्या या गुन्ह्यातील फरार आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, सवाईराम, कदम आणि शेटे यांनी सहभाग घेतला. ३४ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची या कारवाईतून प्रचिती आली आहे.


