( गणपतीपुळे / वैभव पवार )
नागालँडची राजधानी कोहिमा येथे 27 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमधील 14 वर्षाखालील गटातील तायक्वांदो स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे गावचा सुपुत्र संगम सुयोग चव्हाणने सुवर्णपद पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी केली आहे. त्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देश पातळीवर रोशन केले आहे.
संगम चव्हाण ने संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली महाराष्ट्र संघांमध्ये निवड निश्चित केली होती. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांने राष्ट्रीय स्तरावर तायक्वांदो स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्णपद पटकावले आहे.
संगम चव्हाण हा मालगुंड येथील मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज आणि बळीराम परकर विद्यालयातील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी आहे. शालेय अभ्यासाबरोबरच तायक्वांदो स्पर्धेमध्ये त्यांने मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे आतापर्यंत सर्वच स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून त्याचे प्रशिक्षक रूपेश तावडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली त्याने तायक्वांदो स्पर्धेत चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे सराव करून आपली कामगिरी उंचावत आपल्या शाळेबरोबरच संपूर्ण जिल्ह्याचे आणि गणपतीपुळे गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे.
या स्पर्धेसाठी संगमचे प्रशिक्षक रुपेश तावडे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्याला लाभले आहे. त्यांच्या अतिशय कुशल मार्गदर्शनामुळेच संगमने राष्ट्रीय स्तरापर्यंतची स्पर्धा आपल्या दृढ आत्मविश्वास आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गाजवून सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे तावडे सरांचे ही कौतुक आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संगमच्या या राष्ट्रीय स्तरावरील अतिशय कौतुकास्पद आणि सर्वोत्तम उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण गणपतीपुळे आणि पंचक्रोशीतील गावांमधून त्याचे विशेष अभिनंदन होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या ह्या अतिशय सर्वोत्तम कामगिरीबद्दल संपूर्ण गणपतीपुळे आणि मालगुंड गावासाठी हा गौरवाचा व अभिमानाचा क्षण ठरल्याची भावना व्यक्त होत असून संगम ने आपल्या भावी वाटचालीत देश पातळीपर्यंतच्या स्पर्धा गाजवून खूप मोठा सर्वोत्तम दर्जाचा खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण करावी अशी सदिच्छा देखील व्यक्त करण्यात आली असून त्याच्या आगमनासाठी आणि स्वागतासाठी आता संपूर्ण गणपतीपुळे आणि मालगुंड वासिय आतुर झाले आहेत.
संगमने राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपद पटकावल्याची बातमी समजतात संपूर्ण गणपतीपुळे येथील ग्रामस्थ व पालक तसेच ग्रामपंचायत, विविध संस्था संघटना आणि ओम साई शांती ग्रुप गणपतीपुळे त्याचबरोबर मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर व त्यांचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बंधू मयेकर व त्यांचे सर्व संचालक मंडळ, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्यावतीने त्याचे विशेष कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले आहे.

