(मंडणगड)
घराचे बांधकाम सुरू असताना वाद घालून वृद्धासह त्याच्या कुटुंबीयांवर लाकडी दांड्याने हल्ला करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पंदेरी येथील मस्जिद मोहल्ला येथे घडली.
याप्रकरणी महम्मद हनीफअलीमिया तहविलदार (वय ७३) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपी नदिम अब्दुल शकुर तहविलदार (रा. पंदेरी, मस्जिद मोहल्ला) याने घरासमोरील परिसरात येऊन कोणताही कारण नसताना शिवीगाळ केली आणि दमदाटी करत लाकडी दांड्याने महम्मद हनीफ आणि त्यांचा मुलगा मुस्तफा तहविलदार यांना मारहाण केली. याशिवाय फिर्यादींच्या पत्नी नुरजहा हिना यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी गु. र. क्र. ३०/२०२५ अन्वये आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

