(राजापूर / तुषार पाचलकर)
“लोकमान्य टिळकांनी सामाजिक सुधारणांपेक्षा स्वातंत्र्य आधी असा आग्रह धरला. रत्नागिरीसारख्या दुर्गम भागातून जाऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जी असामान्य कामगिरी केली, ती आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या पत्रकारितेचे आदर्शत्व आजही कायम आहे. टिळकांनी जहाल युगाचा प्रारंभ करून ब्रिटिश सत्तेला ‘सोळो की पळो’ करून सोडले. त्यांच्या विचारातील निडरपणा त्यांच्या कृतीतून दिसून येतो.
अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवस शाळा शिकून मराठी साहित्यात अनमोल कार्य केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात पोहोचवली. शोषित व वंचित घटकांचे वास्तव आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी मांडले. साम्यवाद, मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. म्हणूनच या दोन्ही विभूतींच्या नावापुढे ‘लोक’ हा शब्द लागतो. त्यांच्या नावापुढे लागलेल्या या शब्दातून त्यांच्या कार्याची महती स्पष्ट होते. आपण सर्वांनी या विभूतींच्या विचारांचे व कार्याचे वारसदार व्हावे,” असे आवाहन डॉ. विकास पाटील यांनी केले.
ते श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित ‘लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती’ कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला गती देत देशाला मोठे योगदान दिले. तर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यात क्रांतिकारी भर टाकत समतेचा लढा अखेरपर्यंत सुरू ठेवला. आपण त्यांच्या विचारांचे पाईक व्हावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बी. टी. दाभाडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.