(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख पठारवाडी–वाशी–देवळे मार्गे चाफवलीकडे जाणारा रस्ता रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तसेच ग्रामस्थांनी सदर झाडी त्वरित तोडण्याची मागणी केली आहे.
हा रस्ता मागील वर्षीच डांबरीकरण करण्यात आला असून, नियमांनुसार संबंधित ठेकेदाराने पाच वर्षे रस्त्याची नियमित देखभाल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे झाडीच्या वाढीमुळे एखादा अपघात झाल्यास जबाबदार ठेकेदारच ठरणार आहे, असे मत वाहनधारकांनी स्पष्टपणे व्यक्त केले आहे.
देवळे ते देवरुख हा सर्वात जवळचा जोडमार्ग असल्यामुळे या रस्त्यावर रिक्षा, बाईक, कार, टेम्पो आणि ट्रकांची सतत वाहतूक असते. हा रस्ता सध्या अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
रस्त्यावर मुळातच काही धोकादायक वळणे असल्यामुळे, झाडी नसतानाही समोरून येणारे वाहन दिसण्यास अडचण येते. आता तर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे दिवसादेखील दृश्यमानता कमी होत आहे, तर रात्री वाहन चालवणे अधिक धोकादायक झाले आहे, असे वाहनचालक सांगतात.
याशिवाय वाशी आणि चाफवली परिसरात गवारेडे (बायसन) अनेकदा रस्त्यालगत दिसतात. झाडीमुळे हे प्राणी अचानक रस्त्यावर येण्याची शक्यता अधिक वाढली असून अपघाताचा धोका तीव्र झाला आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“या रस्त्यावर झाडी कापण्याची तातडीने उपाययोजना न केल्यास, अपघात झाल्यास जबाबदार अधिकारी आणि देखभाल न करणारा ठेकेदार ठरेल.”

