(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलिस ठाण्यातील “पोलीस बॉईज संगमेश्वर गणेश राजा” यांचे विसर्जन रविवारी रात्री भक्तिमय वातावरणात करण्यात आले. गुलाल, फटाके आणि डीजे विरहित ही विसर्जन मिरवणूक तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठीही एक आदर्श ठरली.
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात, पुष्पवृष्टी आणि भक्तिगीतांच्या तालावर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात बाप्पांना शास्त्री नदीत जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.

पोलिसांना कोणत्याही सणाचा पूर्ण आनंद घेता येत नाही. २४ तास ड्युटी, उन्हाळ्याची, कडाक्याची झळ, थंडीची हुडहुडी आणि पावसाळ्यातील मुसळधार पाऊस सहन करत ते समाजाच्या सुरक्षिततेसाठी कायम तत्पर असतात. घरगुती सण साजरे करता न आल्याने, पोलिसांनी गेली अनेक वर्षे ठाण्यातच गणपती बसवण्याची परंपरा सुरू ठेवली आहे.
यंदाही पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवात बारा दिवस भजन, आरत्या, टिपऱ्या आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले.

अनंत चतुर्दशीला जनतेच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर, पोलिसांनी मात्र आपले कर्तव्य पार पाडत रविवारी रात्री स्वतःच्या गणपतीचे विसर्जन केले. पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक साधेपणाने व शिस्तबद्ध पार पडली. यावेळी डीजे, गुलाल किंवा फटाक्यांचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.
ड्रेसकोडचे वैशिष्ट्य :
या मिरवणुकीत पोलिस निरीक्षकांपासून ते पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्डपर्यंत सर्वजण एकाच रंगाच्या ड्रेसकोडमध्ये सहभागी झाले होते. “बाप्पासमोर सर्व समान – कोणी उच्च नाही, कोणी कनिष्ठ नाही” असा संदेश या कृतीतून समाजाला दिला गेला.
महिला व पुरुष पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात गगनभेदी जयघोष करत, आनंदाश्रूंनी ओथंबलेल्या अंतःकरणाने पोलिसांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

