(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षेला बळकटी देणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि महामार्गावरील प्रवाशांचा जीव सुरक्षित ठेवणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहनाची भर पडली आहे. पोलीस मुख्यालयात शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या प्रणालीशी सुसंगत असलेले हे इंटरसेप्टर वाहन जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवर कार्यरत राहणार आहे. वेगमर्यादा ओलांडणारे वाहनचालक, सीट बेल्ट न लावणारी चारचाकी वाहने, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे तसेच जड व चारचाकी वाहनांकडून होणारे इतर नियमभंग या सर्वांवर पूर्णपणे स्वयंचलित व तांत्रिक पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाईतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांना नवे परिमाण लाभणार आहे. जिल्ह्यातील महामार्गांवर बेफाम वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे घडणाऱ्या अपघातांची मालिका कमी करण्यासाठी हे वाहन महत्त्वपूर्ण ठरणार असून वाहतूक नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी ही प्रणाली निर्णायक ठरेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
लोकार्पण सोहळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके, पोलीस निरीक्षक विवेक पाटील, वाहतूक शाखेचे अधिकारी नितीन भोयर, मोटार परिवहन विभागातील अधिकारी तसेच वाहतूक शाखेतील अंमलदार उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवर वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, निर्धारित वेगमर्यादेत वाहन चालवावे आणि अपघात तसेच कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.

