(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील राजकीय घडामोडींना नवे वळण देणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडीत भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी आपल्या तब्बल १५० निष्ठावान कार्यकर्त्यांसह रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या सामूहिक शक्तिप्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बळात महत्त्वपूर्ण वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रवेश सोहळ्याला पक्षाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे शिवबंधन बांधून उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि जल्लोषातून आपला उत्साह प्रकट केला.
या प्रसंगी उपनेते बाळ माने म्हणाले, “जनतेच्या प्रश्नांसाठी, स्थानिक विकासासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी आज सर्वांनी एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे. शिवसेनेची लोकनिष्ठ विचारधारा आणि जनतेवरील आस्था हेच पक्षाचे बळ आहे.” त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले.
विलणकर यांच्या प्रवेशामुळे शहरातील नवे नेतृत्व अधिक बळकट होत असल्याची भावना यावेळी दिसून आली. नव्या कार्यकर्त्यांनी शहर विकास, सामाजिक प्रश्न आणि नागरिकांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. या सामूहिक प्रवेशाने शहरातील शिवसेना संघटन अधिक सक्षम आणि उत्साही झाल्याचे अधोरेखित झाले.

