(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर कुणबी समाजाच्या आरक्षण हक्कासाठी आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने आंबेडखुर्द येथील कुणबी भवनात ‘भव्य आभार व नवी दिशा’ सभा मोठ्या उत्साहात पार पडली. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्यावतीने आयोजित या सभेला तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेकडो समाज बांधवांनी उपस्थित राहून समाज एकतेचा दमदार संदेश दिला.
सभेच्या व्यासपीठावर कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, सुरेश भायजे, सहदेव बेटकर, अविनाश लाड, नितीन लोकम, रोशन पाटील, संदीप गीते, कृष्णा हरेकर, संजय गोधळी, शरदचंद्र गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांनी यावेळी भाषणात म्हटले की, कुणबी समाजाने एकत्र येऊन आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे अत्यावश्यक आहे. कुणबी मोर्चा यशस्वी झाला असला तरी अद्याप मुख्यमंत्री भेटलेले नाहीत. गेल्या चार वर्षांपासून निवडणुका न घेता कोट्यवधी रुपयांचा निधी गोठवण्यात आला आहे. समाजातील मतभेद बाजूला ठेवून आपण एकजूट दाखवली पाहिजे, असे ते म्हणाले.
नितीन लोकम यांनी समाजातील बांधवांना एकत्र राहण्याचे आवाहन करत “ही सभा आपल्या निर्धाराची साक्ष आहे; कुणबी समाजासाठी लढा अखंड राहणार आहे, असे ठामपणे सांगितले. तर सहदेव बेटकर यांनी कोणताही पक्ष असो, पण तो कुणबी असावा. संतोष थेराडे यांच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन, असा विश्वास व्यक्त केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले अनिल नवगणे म्हणाले, कुणबी समाजाने दाखवलेली एकजूट आणि ताकद अभिमानास्पद आहे. समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकदिलाने पुढे येणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले. या सभेच्या शेवटी सर्व वक्त्यांनी तोडा-मोडा करून राज्य करणारांना आता जागा नाही, असा इशारा देत कुणबी आरक्षणावर दुसऱ्या कुणाचाही हक्क चालणार नाही, असा ठाम संदेश दिला.

