(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच यंत्रणांनी सतर्क राहता यावे या उद्देशाने जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात नुकतीच एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील सर्व स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक देवस्थानचे सुरक्षारक्षक व ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे सदस्य पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी सतर्क राहून सुरक्षेच्या दृष्टीने कटाक्षाने आणि गांभीर्याने लक्ष घालून पर्यटकांना समुद्राच्या धोक्याबाबत योग्य त्या सूचना व माहिती देऊन पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच मागील ऑक्टोबर महिन्यात पुणे जिल्ह्यातील आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. तर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापुर येथील 35 वर्षीय पर्यटक अद्याप बुडून बेपत्ता आहे. त्यामुळे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन स्थानिक व्यावसायिक जीवरक्षक व ग्रामस्थांनी सतर्क राहून येणाऱ्या भक्त व पर्यटकांना वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या समुद्राच्या भौगोलिक स्थितीची माहिती देऊन समुद्रात पडलेले चाळ व खड्डे आदींबाबत सूचना कराव्यात तसेच येणाऱ्या भक्त व पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात आंघोळीसाठी जाऊ नये,
समुद्राच्या कमी पाण्यातच अंघोळीसाठी उतरावे, त्याचबरोबर शक्यतो लहान मुलांना समुद्राच्या पाण्यात पाण्यात नेऊ नये अशा स्वरूपाच्या देखील सूचना भक्त व पर्यटकांना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समुद्रकिनाऱ्यावर पोलीस कर्मचाऱ्यांची नेहमीच गस्त राहणार आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला संबंधित स्थानिक व्यावसायिक जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी योग्यप्रकारे सहकार्य करावे आणि समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवून दुर्घटनेला आळा घालण्यासाठी सर्वांनी सतर्क रहावे अशा सूचना पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी विशेष बैठकीत केल्या आहेत.
या विशेष बैठकीत त्यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांची संख्या वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच दर शनिवार व रविवारी आणि सुट्टीच्या हंगामात समुद्रकिनाऱ्यावर ज्यादा पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली जाईल असे देखील त्यांनी सांगितले आहे.
एकूणच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील भक्त व पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेला गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती तसेच समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिक, जीवरक्षक व ग्रामस्थांनी सतर्क राहून सहकार्य करावे असे आवाहन जयगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे. या बैठकीला त्यांच्यासमवेत संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच निलेश कोल्हटकर, पंच डॉक्टर श्रीराम केळकर, विद्याधर शेंडे, मालगुंड गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय माने, परिसरातील महसूल गावांचे पोलीसपाटील, समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

