(देवरूख / प्रतिनिधी)
देवरुख हायस्कूलमधील कु. ओमकार झोरे या विद्यार्थ्याने शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ.तृप्ती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली Bicycle powered flour mill हे उपकरण तयार केले होते. या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात दुसऱ्यांदा राज्यस्तरावर जाण्याचा मान या शाळेने मिळवला आहे
एन्स्पायर अवॉर्ड मानक 2023/24 व 2024/25 या दोन्ही वर्षातील अवॉर्ड प्राप्त विद्यार्थांचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी एकत्रितपणे न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे दिमाखात पार पडले. या प्रदर्शनात एकूण 103 विद्यार्थांनी सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. त्यापैकी न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख यांनी तयार केलेले उपकरणात जुनी सायकल, जुने जाते, गिअर बॉक्स यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या उपकरणाचे अनेक फायदे आहेत. विजेची, पैशाची,वेळेची बचत, पर्यावरणपूरक, व्यायाम करण्यासाठी उपयुक्त, कॅन्सर, लठ्ठपणा, निद्रानाश, हार्ट अटॅक, फूड पॉयझनिंग अशा अनेक आजारांना पळवून लावणारे तसेच गरिबांना परवडणारे असे हे उपकरण आहे. या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे
या यशाबद्दल कु. ओमकार झोरे व मार्गदर्शक शिक्षिका सौ. तृप्ती कांबळे यांचे मुख्याध्यापक मधुकर कोकणी, पर्यवेक्षक अनंतकुमार मोघे. तसेच मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, सौ. नेहा जोशी यांनी अभिनंदन केले व भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

