(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समितीच्या गाव शाखेत उद्या रविवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी वर्षावास या धार्मिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांचे विद्यमाने व पोमेंडी गाव शाखेच्या विशेष सहकार्याने सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे
सदर कार्यक्रम पोमेंडी गावशाखेचे स्थानिक अध्यक्ष यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमात सैतवडे जयभीमनगर येथील बौद्धजन पंचायत समितीचे विद्यमान अध्यक्ष आणि खंडाळा येथील माध्यमिक हायस्कूलचे शिक्षक शिक्षक सुवेश चव्हाण सर यांचे विशेष धम्म प्रवचन होणार आहे. सुवेश चव्हाण यांचा धार्मिक विषयावर मोठा पगडा आहे. त्यांनी गतवर्षी वर्षावास कार्यक्रमात अनेक वेळा धार्मिक प्रवचन केले असून लोकांमध्ये धर्मविषयक जागृती करण्याचे काम केले आहे.
एकूणच यंदाच्या धार्मिक प्रबोधन वर्षावास कार्यक्रमात त्यांचे पोमेंडी गाव शाखेत धम्मप्रवचन होत असून या कार्यक्रमाला तालुक्यातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका शाखेचे पुन्हा नियुक्ती झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत आदींसह संस्कार समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच बौद्धाचार्य व श्रामनेर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम करण्यासाठी पोमेंडी गावशाखेचे पदाधिकारी व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.