(लातूर)
मंगळवारी (दि. ७) सकाळी सुमारे ११:३० वाजता औसा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. प्रसाद पद्माकर शिंदे (वय २५) आणि त्याची लहान बहीण गायत्री पद्माकर शिंदे (वय १७) ही दोघे दुचाकीवरून (एम.एच.२४-बीएम-०६५३) लातूर येथे कॉलेजला जाण्यास येत होते. अचानक भरधाव बोलेरो कार त्यांच्या दुचाकीला धडकली आणि त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली दोघे चिरडले गेले. अपघात इतका भयंकर होता की दोघांचेही डोके आणि छातीपासून वरच्या भागाला गंभीर दुखापत झाली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.
शेतकरी पद्माकर शिंदे यांच्या कुटुंबात प्रसाद आणि गायत्री अशी दोनच मुले होती. १२ वी पर्यंत शिकलेला प्रसाद वडिलांना दुध व्यवसायात मदत करत असे, तसेच लहान बहिण शिकत होती. मनमिळाऊ स्वभाव आणि शिक्षणाची गोडी असलेली गायत्री फॅशन डिझायनरच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. एकाच वेळी दोन पोटची मुले अपघातात गमावल्याचे पाहून आई-वडिलांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. या दुर्दैवी घटनेने वाघोली गावात सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. वाघोली गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातानंतर बोलेरो कार आणि ट्रक चालक फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित पंचनामा केला आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. पोलिस दोन्ही फरार वाहनांचा कसून शोध घेत आहेत.

