मराठी, हिंदी आणि रंगभूमीवर प्रभावी कामगिरी करणारी मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सौंदर्य, साधेपणा आणि दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी गिरिजा, ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’, ‘गुलमोहर’, ‘हाऊसफुल’, ‘लज्जा’ अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. अभिनेते गिरीश ओक यांची कन्या असल्याने अभिनयाचा वारसा तिला घरातूनच मिळाला.
गिरिजा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असून, तिचे फोटो नेहमी चर्चेत राहतात. पण यावेळी तिचा निळ्या साडीतील लूक इतका व्हायरल झाला की, चाहते तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणू लागले. काही जणांनी तर तिची तुलना सिडनी स्वीनी आणि मोनिका बेलुची यांच्याशीही केली. मात्र, या प्रेमासोबतच सोशल मीडियाचा काळा चेहराही समोर आला. काही लोकांनी गिरिजाचे फोटो आणि व्हिडिओ एआयच्या मदतीने अश्लील पद्धतीने एडिट करून व्हायरल करण्यास सुरुवात केली. यावर प्रतिक्रिया देत या अभिनेत्रीने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
गिरिजाची प्रतिक्रिया
“अचानक इतकं प्रेम मिळतंय, मेसेज येतायत, फोन येतायत… छान वाटतंय. पण त्याचवेळी काहीजण माझे फोटो एआयने बदलून अश्लील पद्धतीने व्हायरल करत आहेत. हे पाहून भीती वाटते. माझा मुलगा आता १३ वर्षांचा आहे. त्याने हे फोटो पाहिले तर त्याला कसं वाटेल? त्याला माहीत असेल की हे खरे नाहीत… तुम्हालाही माहीत असतं! पण पाहताना काहीजणांना चीप मजा येते. कृपया विचार करा.” असे तिने म्हटले आहे.
गिरिजाने सांगितले की, फोटो व्हायरल होत असल्याची तिला सुरुवातीला कल्पनाच नव्हती. रविवारी माझा फोन सतत वाजत होता. नंतर समजलं की काही घाणेरडी सोशल हँडल्स माझे फोटो उचलत आहेत. पण मराठी चाहत्यांनी त्यांना छान उत्तर दिलं—‘तुम्ही तिला आत्ता शोधले, आम्ही तिला वर्षानुवर्षे ओळखतो’. एआय छेडछाडीबद्दल तिने म्हटले आहे की, “हा एक ट्रेंड आहे—येईल आणि जाईल. पण माझं कामच माझी ओळख आहे. लोकांनी माझं काम पाहिलं, तर त्यापेक्षा इतर मोठं काहीच नाही. सुदैवाने मी चित्रपटसृष्टीतील कुटुंबातून आलेय. बाबा अभिनेते आहेत, सासरे निर्माते आहेत,पती दिग्दर्शक-निर्माते आहेत. लोक काय लिहितात काय व्हायरल करतात हे आपण रोखू शकत नाही, त्याकडे दुर्लक्ष करण्याची ताकद त्यांच्यामुळे मला मिळाली,” असे ती म्हणाली.

