(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत कायमच “जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा” प्रकार सुरू आहे. मात्र, यावेळी तर कहरच झाला. रस्ता बंद करण्याचे फलक लावून, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि बॅनरद्वारे जनजागृती करण्यात आली. जनतेनेही प्रामाणिकपणे सहकार्य दाखवत पर्यायी मार्गांचा अवलंब केला, खडबडीत, दर्जाहीन व ओबडधोबड रस्त्याने प्रवास करण्याचा त्रास सहन केला, पण प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरूच झाले नाही.
महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि ठेकेदार यांनी नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल केली, अशी जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
१३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत गर्डर बसविण्याचे काम करण्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे फलक काही दिवसांपूर्वी लावण्यात आले होते. ही माहिती प्रसारमाध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत पोहोचली आणि लोकांनी मोठ्या संयमाने सहकार्य केले. मात्र, ठरलेल्या दिवशी आज १३ नोव्हेंबरला कामाला सुरुवातच झाली नाही.
कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, “गर्डर उचलण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन नादुरुस्त झाल्यामुळे काम थांबवावे लागले,” असे स्पष्टीकरण देण्यात आले.
पण या उत्तराने जनतेचा संताप अधिकच वाढला. नागरिकांचे म्हणणे आहे की, “ज्या जोमाने फलक रंगवण्यात आणि सूचना देण्यात वेळ खर्च केला, त्याच जोमाने यंत्रसामग्रीची पूर्वतयारी केली असती, तर एक दिवस वाया गेला नसता.” या विलंबामुळे पुन्हा एक दिवस अधिक महामार्ग बंद राहणार असून, त्याचा त्रास सामान्य प्रवाशांनाच सहन करावा लागणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे. दरवेळी नवीन तारीख जाहीर केली जाते, पण प्रत्यक्षात प्रगती शून्यच! अशी स्थिती आहे. “जनतेच्या त्रासाची पर्वा या अधिकाऱ्यांना आहे का?” असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.
गर्डर बसविण्याच्या कामासाठी रस्ता बंद करण्याच्या आदेशाचे पालन करून जनतेने शिस्त दाखवली, पण प्रत्यक्षात काम न झाल्याने जनतेच्या भावना भडकल्या. दुपारनंतर या संतापाचा परिणाम म्हणूनच की काय, कामाचा फलक बदलण्यात आला आणि ‘१३ तारीख’ खोडून टाकण्यात आली, एवढाच काय तो बदल दिसून आला!

