( रत्नागिरी /प्रतिनिधी )
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व रत्नागिरी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. अशाच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी १२ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बहुजनवादी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन काही स्थानिक विषयांबाबत चर्चा केली.
बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, RPI गवई गटाचे एल. व्ही. पवार, बीएसपीचे किशोर पवार, वंचितच्या महिला जिल्हाध्यक्ष बेटकर मॅडम, बीएसपीचे शहराध्यक्ष रुपेश कांबळे, वंचितचे जिल्हा माजी महासचिव मुकुंद सावंत, सुनील अंबुलकर, देवेन कांबळे, दीपक जाधव, रत्नदीप कांबळे, संजय आहिरे, शिवराम कदम आदींसह बहुजनवादी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच बहुजनवादी पक्षांच्या एकत्र येण्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती झाली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांच्यासोबत राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटीत प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली असली, तरी भविष्यात बहुजनवादी एकजुटीच्या पक्षांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुजनवादी पक्षांनी आगामी निवडणुकीमध्ये एकजुटीने निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तसेच इतर पक्षांप्रमाणे स्वतःचे उमेदवार मैदानात उतरवण्याची त्यांची तयारीही सुरू आहे. बहुजनवादी शक्तींच्या या नव्या राजकीय हालचालींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये रत्नागिरीच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
दरम्यान या भेटी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले असे सांगितले की, राजकीय पक्षाचे नेते-मंडळीसोबत भेटी-गाठी होत राहतात. याचा अर्थ पाठिंबा दिला किंवा युती केली असा होत नाही. एकत्र आलेल्या बहुजनवादी पक्षाच्या कोणत्याही पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युती किंवा पाठिंबा या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. थिबा राजा संघर्ष समितीचे नाव हे चुकीच्या पद्धतीने घेतले जात असून त्यातून जाणूनबुजून संभ्रम निर्माण करण्यासाठी काही पिलावळ पुढे येईल. परंतु बहुजनवादी राजकीय पक्ष एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बहुजनवादी शक्ती आगामी निवडणुकीत वेगळं स्थान निर्माण करेल यात शंकाच नाही. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करू नये.
अनेक पक्षांबरोबर चर्चा-बैठका होत राहतील मात्र….
शिव, शाहू फुले आंबेडकर विचारांचे पक्ष ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी प्रस्थापित पक्षांच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकत असते. रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक आम्ही एकजुटीने व ताकतीने लढणार आहोत. युती पाठिंब्यासाठी अनेक पक्षांबरोबर चर्चा-बैठका होत राहतील मात्र आमचा अजेंडा आमच्यासाठी राहील! आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बहुजनवादी पक्ष एकत्र आलेलो आहोत. कोणत्या पक्षाबरोबर युती करायची किंवा पाठिंबा द्यायचा ते त्या त्या वेळी निश्चित करून आमच्या स्तरावर जाहीर केले जाईल. त्यामुळे कोणीही कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. अशी प्रतिक्रिया बीएसपीचे पदाधिकारी किशोर पवार यांनी दिली आहे.

