(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गणपती विसर्जनाचा बंदोबस्त आटोपून परतत असताना कुवारबाव ग्रामपंचायतीजवळ झालेल्या वादात हस्तक्षेप करणाऱ्या होमगार्डवर एका तरुणाने हल्ला केल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. होमगार्डचा गणवेश परिधान केलेला असतानाही त्याची कॉलर पकडून मारहाण करण्यात आली. तसेच दोन्ही हातांनी गळा दाबून ‘तुला आत्ताच ठार मारून टाकतो,’ अशी धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी मयुर मोहन पाटील (वय २६, रा. पानवल आपकरेवाडी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लखन रामचंद्र चिकोडीकर (वय २९, रा. उत्कर्षनगर, सहजीवन सोसायटी, कुवारबाव) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १०९(१), १२१(१), १३२ आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री ओम साई तरुण मित्र मंडळ, कुवारबाव यांच्या सार्वजनिक गणपती विसर्जनाचा बंदोबस्त आटोपल्यानंतर फिर्यादी मयुर पाटील आणि साक्षीदार हे कुवारबाव ग्रामपंचायतीजवळून जात होते. त्यावेळी लखन चिकोडीकर हा विसर्जनावरून घरी परतणाऱ्या काही व्यक्तींशी वाद घालत मारामारी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून फिर्यादी आणि साक्षीदार यांनी भांडण सोडविण्यासाठी हस्तक्षेप केला.
यावेळी मयुर पाटील यांनी होमगार्डचा गणवेश परिधान केला होता. तसेच ते गणपती विसर्जनाच्या पोलिस बंदोबस्तासाठी कार्यरत असल्याची माहिती संशयित आरोपीला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तरीही आरोपीने त्याकडे दुर्लक्ष करून पाटील यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना खेचले. त्यानंतर हाताच्या थापटाने मानेवर आणि तोंडावर मारहाण केली. याच झटापटीत आरोपीने दोन्ही हातांनी पाटील यांची मान जोराने दाबून पकडली आणि ‘तुला आत्ताच ठार मारून टाकतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. झटापटीत पाटील यांच्या होमगार्ड गणवेशाचे एक बटन तुटून नुकसान झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कुवारबाव ग्रामपंचायतीजवळ घडली. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.


