(मुंबई)
अखिल भारतीय नाट्य परिषदेशी संलग्न असलेली बालरंगभूमी परिषद ही संस्था राज्यभरातील बालकांच्या कलागुणांचा आणि भावविश्वाचा विकास करण्यासाठी कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य हौशी बालनाट्य स्पर्धेच्या आयोजनात परिषदेकडून स्थानिक पातळीवर सहकार्य आणि समन्वय साधावा, असा निर्णय सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि बालरंगभूमी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता.
त्याअनुषंगाने, ४ ऑगस्ट २०२५ रोजी परिषदेला अधिकृत पत्र देण्यात आले. या पत्रात परिषदेकडून समन्वयकांची व परीक्षकांची नावे सुचविणे तसेच इतर आयोजनात्मक बाबींमध्ये मदत करणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, परीक्षक आणि समन्वयकांची अंतिम निवड ही सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडूनच केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या पत्राच्या काही भागांचा गैरसमज करून काही माध्यमांतून आणि संघटनांतून या स्पर्धेचे “हायजॅक” झाल्याचा आरोप करण्यात आला होता. संचालनालयाने या दाव्यांना पूर्णतः खोटे ठरवले आहे. संचालनालयाच्या मते, या पत्रात कुठेही स्पर्धेचे संपूर्ण आयोजन बालरंगभूमी परिषदेला दिल्याचा उल्लेख नाही. उलट, परिषदेकडून फक्त स्थानिक सहकार्य व समन्वय करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही खाजगी संस्थेला ही स्पर्धा संपूर्ण आयोजनासाठी दिलेली नाही. ही स्पर्धा पूर्वीप्रमाणेच शासनाच्या अखत्यारीत आणि नियंत्रणाखालीच पार पडणार आहे.
संचालनालयाने याबाबत सांगितले की, “काही संस्थांनी आणि नोंदणीकृत नसलेल्या संघटनांनी या निर्णयाचा विपर्यास करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात दिशाभूल करणारे दावे केले आहेत, जे सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने गैर आहे.”
शासनाच्या वतीने गेली अनेक वर्षे विविध संस्थांच्या सहकार्याने सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याचे सांगत संचालनालयाने नागरिकांना आणि कलाकारांना आवाहन केले आहे की, राजकीय फायद्यासाठी गैरसमज पसरवू नयेत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सुसंवाद आणि सहकार्याचे वातावरण अबाधित ठेवावे.

