(पुणे)
सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. यावेळी त्यांनी संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा केली.
पुण्यात रंगला अनावरण सोहळा
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ख्यातनाम हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण झाले. वयाच्या शंभरीत पदार्पण केलेल्या फडणीस यांनीच हे बोधचिन्ह साकारले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री व संमेलन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत उपस्थित होते.
मराठीसाठी नवे उपक्रम
बोधचिन्हाच्या अनावरणानंतर मंत्री उदय सामंत म्हणाले की—
- मराठी भाषेची परंपरा शालेय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी साहित्यिकांवरील अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
- उत्तमोत्तम जागतिक साहित्याचे मराठीत अनुवाद व्हावेत, याकरिता अनुवाद समिती स्थापन केली आहे.
- अमराठी लोकांसाठी मराठी शिकविणारे ॲप विकसित केले जाणार आहे.
- मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी लंडनमध्ये वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू केले जाणार आहे.
- भविष्यात विश्व साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, बालसाहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस आहे.
बोधचिन्हाचा संदेश
बोधचिन्हामधील लेखणी व तलवारीचे प्रतीक साहित्यनिर्मितीबरोबरच सामाजिक दंभ आणि ढोंगावर प्रहार करणारे आहे, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. तर “हे बोधचिन्ह सरकारलाही बोध देणारे आहे. मराठी भाषेवर अन्याय होऊ नये आणि अन्याय करणाऱ्यांवर वार केला जावा, असा संदेश त्यातून मिळतो,” असेही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

