(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी येथील अथर्व क्लिनिकसमोर मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात एक गाय जागीच ठार झाली, तर दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
साताऱ्याचे रहिवासी योगेश रामदास चव्हाण (वय 30) आणि रोहित मोहन चव्हाण (वय 25), सध्या वांद्री येथे वास्तव्यास असलेले, हे दोघेजण दुचाकीवरून संगमेश्वरच्या दिशेने येत होते. दरम्यान, रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीने गाईला जबरदस्त धडक दिली. या धडकेत गाय काही अंतरावर फेकली जाऊन जागीच मृत्यूमुखी पडली, तर दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित दीपेश राऊत आणि सौरभ फटकरे यांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिका बोलावून जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल विनय मनवल आणि कॉन्स्टेबल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींपैकी एका युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कानातून रक्तस्त्राव होत होता, तर दुसऱ्यालाही गंभीर जखमा झाल्या. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर रिशप सिंग यांनी प्राथमिक उपचार करून दोघांनाही पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

