(रत्नागिरी /चिपळूण प्रतिनिधी )
लोटे औद्योगिक वसाहतीत शिंदेसेनेचे काही पदाधिकारी व्यावसायिकांकडून खंडणीची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी सोमवारी केला. आमच्या कंपनीच्या सुपरवायझरकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून, या संदर्भातील तक्रार खेड पोलिस ठाण्यात देण्यास गेलो असता, काही नावे वगळल्यासच तक्रार स्वीकारली जाईल, अशी अटच पोलिसांनी घातली, असा धक्कादायक आरोप जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.
जाधव यांनी सांगितले की, सुवर्ण भास्कर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही लोटे एमआयडीसी परिसरातील विजय केमिकल प्रा. लि. या कंपनीचे काम पाहत आहे. काम सुरू असताना शिंदेसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी तेथे आले व काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले. “प्रथम आम्हाला विश्वासात घ्या, असे सांगून त्यांनी दबाव आणला. आमचा सुपरवायझर हा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या कंपनीत कार्यरत असल्याचे समजताच, त्या पदाधिकाऱ्यांनी काम सुरू ठेवण्यासाठी थेट दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप जाधव यांनी केला.
या प्रकरणाची आम्ही खेड पोलिसांकडे तक्रार दिली असता, काही नावे वगळल्यासच तक्रार स्वीकारली जाईल, अशी अट पोलिसांनी ठेवली. यावरूनच पोलिसांवर दबाव असल्याचे स्पष्ट होते, असे जाधव म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “लोटे एमआयडीसीत काम करायचे असेल, तर आम्हाला विश्वासात घ्या, नाहीतर तुमचे काम बंद पाडू, अशी उघड धमकीही संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी तक्रार न स्वीकारल्याने आम्ही आता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी केली.

