(सावंतवाडी)
वर्षा पर्यटनाचा आनंद घेत असताना आंबोलीतील कावळेसाद धबधब्याजवळ कोल्हापूरचा एक युवक 400 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. संबंधित युवकाचे नाव राजेंद्र बाळासो सनगर (वय 45, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे असून, ते कोल्हापूर जिल्हा परिषद येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
राजेंद्र सनगर हे आपल्या 14 मित्रांसह आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. या दरम्यान, कावळेसाद धबधब्याजवळ पाण्याच्या प्रवाहात उडालेला रुमाल पकडण्याच्या प्रयत्नात वाऱ्यांच्या वेगामुळे ते निसरड्या जागेवरून पाय घसरून थेट खोल दरीत कोसळले. यावेळी त्या ठिकाणी दरीतून उलटे येणाऱ्या पाण्यात त्यांनी रुमाल उडविण्याचा आनंद घेत होते. यावेळी त्याचा रुमाल दरीच्या तोंडावर पडला यावेळी त्या ठीकाणी रुमाल आणण्यासाठी गेले असता ती जागा निसरडी असल्यामुळे ते थेट दरीत कोसळले. हा प्रकार इतका भयानक होता की कोणाच्या काहीच लक्षात आले नाही. हा प्रसंग इतक्या क्षणात घडला की, मित्रांना काही कळण्यापूर्वीच सनगर दृष्टीआड झाले.
घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी आरडाओरड करून घटनास्थळी मदत मागितली. जवळच असलेल्या स्टॉल चालकांनी तत्काळ या घटनेची माहिती गेळे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर ढोकरे यांना दिली. त्यांनी तात्काळ आंबोली पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.
मात्र दाट धुके आणि वाढता अंधार यामुळे शोधकार्याला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मोहिम अर्धवट थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आज (शनिवार) सकाळी विशेष रेस्क्यू पथकाच्या मदतीने शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सनगर हे मुळचे पन्हाळा तालुक्यातील माले इथले आणि सध्या रा. चिले कॉलनी इथं राहतात. सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांसोबत आंबोली इथं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कावळेसाद पॉईंट इथं रोलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरून ते दरीत कोसळले. अशी माहिती गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली आहे.
राजेंद्र सनगर यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारात प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा घटनास्थळी सतत संपर्कात असून, मदतकार्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी सुरू आहे.