(ओडिशा)
कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा सेबाश्रम शाळेत एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. वसतिगृहात रात्री गाढ झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्या सोबत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी फेविक्विक टाकल्याने आठ विद्यार्थ्यांचे डोळे घट्ट चिकटले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अचानक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना तीव्र वेदना होऊ लागल्याने वसतिगृहात गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना सुरुवातीला गोछापाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्याला डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित सात जणांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, वेळेत उपचार मिळाल्यामुळे गंभीर धोका टळला आहे; अन्यथा विद्यार्थ्यांची दृष्टी कायमची जाऊ शकली असती. घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांनी मित्रांच्या डोळ्यांमध्ये फेविक्विक का टाकले? हा प्रकार विनोद म्हणून केला गेला की काही वादातून घडला, याचा शोध प्रशासन घेत आहे. बालकल्याण अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकारामुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वसतिगृहातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

