( लांजा )
शहरातील माउली नगर येथील साई समर्थ माउली इमारतीतील एका बंद फ्लॅटमधून तब्बल १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुही सुयोग तांबे (वय ३७, रा. सी-००५, साई समर्थ माउली, माउली नगर, लांजा) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १५ जून २०२५ रोजी सकाळी ८ ते २१ जून रोजी सकाळी ७.४५ या कालावधीत त्यांचा फ्लॅट बंद असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने सोन्याचे दागिने चोरून नेले. या चोरीत एकूण ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले असून त्यांची अंदाजित किंमत १ लाख ४८ हजार रुपये इतकी आहे.
फिर्यादीने दिलेली माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर १२२/२०२५ प्रमाणे भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अंतर्गत अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणी पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत. घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.