(मुंबई)
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे महाराष्ट्र राज्याला एकूण ५ पीएम-ई-विद्या (PM eVidya) शैक्षणिक वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे. शाळा व शिक्षक यांच्यावर या चॅनल्सची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यांना यूट्यूबवर सब्स्क्राइब करण्यास प्रोत्साहित करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
२०० शैक्षणिक वाहिन्यांचा राष्ट्रीय उपक्रम
भारत सरकारच्या ‘वन क्लास, वन टीव्ही चॅनल’ या अभिनव संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांसाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राला ५ वाहिन्या देण्यात आल्या आहेत.
कोणत्या इयत्तेसाठी कोणती वाहिनी?
- इयत्ता १ वी व ६ वी – पीएम-ई-विद्या ११३ (SCERTM C113)
- इयत्ता २ री व ७ वी – पीएम-ई-विद्या ११४ (SCERTM C114)
- इयत्ता ३ री व ८ वी – पीएम-ई-विद्या ११५ (SCERTM C115)
- इयत्ता ४ थी व ९ वी – पीएम-ई-विद्या ११६ (SCERTM C116)
- इयत्ता ५ वी व १० वी – पीएम-ई-विद्या ११७ (SCERTM C117)
प्रत्येक वाहिनीवर दररोज सहा तासांचे थेट शैक्षणिक प्रक्षेपण केले जाते, तसेच तेच कार्यक्रम दिवसभरात तीन वेळा पुनर्प्रक्षेपित होतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सोयीच्या वेळेत पाहणे शक्य होते.
कुठे उपलब्ध आहेत वाहिन्या?
ही वाहिन्या डीडी-फ्री डिश व्यतिरिक्त यूट्यूबवर थेट लाईव्ह उपलब्ध आहेत. मासिक वेळापत्रक आणि थेट प्रक्षेपणाची लिंक www.maa.ac.in या संकेतस्थळावर ‘PM eVidya Channels’ या टॅबखाली उपलब्ध आहे. तसेच थेट लिंकद्वारेही प्रवेश मिळू शकतो http://www.maa.ac.in/index.php?tcf=pmev
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षक, अधिकारी आणि पालकांना आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांनी या वाहिन्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे.

