(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील उमरे येथील ओव्हर ब्रिजवर शनिवारी (८ नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत स्वरूप दयानंद कांबळे (वय ३०, रा. उमरे-कांबळेवाडी, रत्नागिरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारास स्वरूप कांबळे हे उमरे गावातील ओव्हर ब्रिज परिसरात गेले असता, त्याचवेळी मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस तेथून धडधडत जात होती. दुर्दैवाने रेल्वेच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तत्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. याबाबत भारतीय दंड विधान कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे उमरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

