(मुंबई / गणेश तळेकर)
मराठी सिनेमा, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी महादेव खामकर यांचे सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. वार्धक्यजन्य आजारामुळे गेल्या १२ फेब्रुवारीपासून त्या सुश्रुषा हॉस्पिटल, शिवाजी पार्क येथे उपचारासाठी दाखल होत्या.
नीलांबरी खामकर यांनी गेली सुमारे ६० वर्षे सिनेमा, नाट्य आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. चार दिवस सासूचे, जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, तसेच महेश कोठारे निर्मित माझी माणसं या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. याशिवाय सिंड्रेला, पेन्शन आणि नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर २ या चित्रपटांतूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
इंडिया युनायटेड मिल (NTC) मध्ये कार्यरत असताना त्यांनी पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा, आंतर गिरणी नाट्यस्पर्धा आणि राज्य नाट्यस्पर्धा यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळवले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबई महानगरपालिका यांनी त्यांना “गुणवंत कामगार पुरस्कार” देऊन सन्मानित केले होते. तसेच महाराष्ट्र शासन आयोजित विविध नाट्यस्पर्धांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिले.
स्वभावाने अत्यंत मनमिळावू, सर्व कलाकारांशी आपुलकीने वागणाऱ्या आणि आईसारखी माया करणाऱ्या नीलांबरी खामकर या नाट्य व सिनेक्षेत्रात आदराने पाहिल्या जात. त्यांना दोन विवाहित कन्या आहेत. आर्थिक अडचणी असूनही स्वाभिमानाने जगण्याचा त्यांचा निर्धार कायम होता. नुकताच त्यांना विघ्नहर्ता संघाचा मानाचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भोईवाडा हिंदू स्मशानभूमी येथे होणार आहे.
अंत्यदर्शनासाठी सकाळी ९ ते ११ या वेळेत पत्ता : रूम नं. ४०३, दीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जेरबाई वाडिया रोड, विको लॅबसमोर, भोईवाडा, नायगाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीने एका समर्पित, संवेदनशील कलाकाराला आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

