(लांजा)
मौजे केळंबे (ता. लांजा) येथील सुधा विष्णुनगर परिसरात दि. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास एक जखमी मादी बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती श्री. संपत खानविलकर यांनी तात्काळ वनविभागाला दूरध्वनीवरून दिली. कळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितपणे लोखंडी पिंजऱ्यात पकडून प्राथमिक उपचारासाठी लांजा येथे आणले.
वनवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीत बिबट्या मादी असून तिचे वय सुमारे दोन वर्षे आहे, तसेच तिचे मागील दोन्ही पाय कमकुवत झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमेची तीव्रता लक्षात घेता लांजा येथे उपचार शक्य नसल्यामुळे पुढील उपचारासाठी बिबट्याला पुणे येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण (भैय्या) सामंत, विधानसभा सदस्य लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघ यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन जखमी बिबट्याची पाहणी केली आणि वनअधिकाऱ्यांना तातडीने उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सदर बचाव मोहिमेत श्रीमती गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) आणि श्रीमती प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही पार पडली. या मोहिमेत प्रकाश सुतार (वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी), सारीक फकीर (वनपाल लांजा), बाबासाहेब ढेकळे (वनरक्षक कोर्ले), नमिता कांबळे (वनरक्षक लांजा) तसेच संजय गोसावी, सत्यवान गुरव, नासिर नवलेकर, नितेश राणे, दीप्ती शेटकर (लांजा पोलिस), पांडुरंग साळुंखे, राजेश झोरे, सुनील कानडे, महेश लांजेकर, सुधाकर झोरे, बशीर लांजेकर, केपूर साळुंखे यांसह स्थानिक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता.
वनविभागाचा तत्पर बचावकार्य आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे बिबट्याला सुरक्षितरीत्या उपचारासाठी रवाना करता आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.

